हक्‍कांसाठी कर्मचार्‍यांची वज्रमूठ, लाखो कर्मचारी देशव्यापी संपावर

Foto

औरंगाबाद- कामगारांची पिळवणूक करीत भांडवलदारांचे हित जोपासणार्‍या मोदी सरकारला चले जाव चा इशारा देत केंद्रीय तसेच राज्य कर्मचारी व कामगार संघटनांनी आज क्रांती चौकातून विभागीय आयुक्‍त कार्यालयावर विराट मोर्चा काढला. देशभरातील १० मध्यवर्ती कामगार संघटना व अखिल भारतीय फेडरेशन्सच्या ५२ शाखांच्या झेंड्याखाली जिल्ह्यातील मध्यवर्ती कामगार संघटना, राज्य संघटना, कंपनी पातळीवरील कामगार संघटना, खाजगी क्षेत्रातील अखिल भारतीय फेडरेशन्स, कामगार कर्मचारी संघटना यांच्या संयुक्‍त कृती समितीच्या नेतृत्वाखाली संघटित व असंघटित क्षेत्रातील तब्बल दोन लाखांवर कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत.

 

या संपाने जिल्ह्यातील खाजगी व शासकीय कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जाचक धोरणांच्या तसेच कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलाच्या विरोधात देशभरातील महत्त्वाच्या १० मध्यवर्ती कामगार संघटना तसेच अखिल भारतीय फेडरेशनच्या ५२ शाखांनी आज (मंगळवार) पासून दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. देशभरातील केंद्रीय कर्मचारी तसेच कामगार संघटना कर्मचार्‍यांच्या हक्‍कांसाठी रस्त्यावर उतरल्यामुळे बँकांसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. 

देशभरातील केंद्रीय कर्मचारी तसेच कामगार संघटना संपाची हाक देत केंद्र व राज्य सरकारच्या जाचक धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

 

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे सुमारे ५०० कामगार संघटनांचे कामगार संघटनेचे दहा हजारावर आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे १६ हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी केंद्रीय संघटनांना पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. बँक कर्मचार्‍यांनी आज सकाळी दूध डेअरी चौकात सरकारविरोधी घोषणा देत जोरदार निदर्शने केली.

 

त्यानंतर हे कर्मचारी क्रांती चौकातून कामगार संघटनांनी काढलेल्या मोर्चात सहभागी झाले. यावेळी विविध संघटनांच्या कर्मचारी तसेच कामगारांनी मोठी गर्दी केली होती. मागण्यांचे फलक हातात घेऊन व संघटनेच्या नावाचा जयघोष करीत कर्मचार्‍यांनी सरकारचा निषेध केला. सरकार भांडवलशाहीच्या दबावाखाली कामगारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप भगवान भोजने यांनी यावेळी केला. स्वतंत्र मजदूर संघाचे अमोल गायकवाड यांनी कामगारांच्या पिळवणुकीच्या विरोधात सर्व संघटना एकवटल्या असल्याचे सांगत सरकारने वेळीच सध्या अस्तित्वात असलेले ४४ कामगार कायदे रद्द करून मालकधार्जिणे चार लेबर कोड बनविण्याचे षङयंत्र थांबविण्याची मागणी केली. बँक कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाच्या उत्पादन व उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी केला. केंद्र सरकारने कर्मचार्‍यांची पिळवणूक थांबवून सार्वजनिक व सरकारी क्षेत्राचे खासगीकरण बंद करावे, अशी मागणीही त्यांनी केली. 

 

या देशव्यापी आंदोलनांतर्गत शहरात क्रांती चौकातून विभागीय आयुक्‍त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने केंद्रीय कर्मचारी, कामगारांनी सहभागी होत एकजूट दाखवून दिली. संयुक्‍त कृती समितीतर्फे विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारने जाचक ४४ कामगार कायदे रद्द करावेत, मालकधार्जिणे चार लेबर कोर्टकोड बनविण्याचे ताबडतोब थांबविण्यात यावे, सरकारी क्षेत्रातील नियमित पदे रद्द करून कंत्राटीकरण बंद करावे, देशातील सर्व असंघटित कामगारांसाठी नवा कायदा तयार करावा, कामगारांना वेतन व सामाजिक लाभ द्यावेत, सर्व शासकीय योजना कर्मचार्‍यांसाठी लागू कराव्यात, नियमित कर्मचार्‍यांचा पगार व सवलती कामगारांना सरकारचे कामगारविरोधी धोरण तातडीने बंद करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी भगवान भोजने, फुलचंद गायकवाड, लक्ष्मण साकुळकर, श्रीकांत फोपसे, सुनील राठोड, सतीश कुलकर्णी, नितीन वागळे, पंडित मुंडे, अमोल गायकवाड, दीपक सोनवणे, प्रवीण शास्त्री आदींची उपस्थिती होती.

 

संपात सहभागी संघटना

 

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, बँक एम्पलॉइज फेदरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया एलआयसी एम्प्लॉईज फेडरेशन, भारतीय मजदूर संघ, मध्यवर्ती कामगार संघटना, केंद्रीय कर्मचारी संघटना तसेच बँक, पोस्ट ऑफिस, दूरसंचार विभाग, संरक्षण विभाग, उत्पादन क्षेत्र, खाण कामगार, विमा उद्योगातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. तसेच केंद्रीय कर्मचारी संघटनांशी संलग्‍न असलेल्या राज्य कर्मचारी सहकारी संघटनेने या संपाला पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे राजेंद्र मुंगीकर, राजेंद्र देवळे, जयश्री जोशी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे हेमंत जामखेडकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रवी धामणकर, बीएसएनएल संघटनेचे जॉन वर्गीस, रंजन दाणी,  विलास सवडे, शिवाजी चव्हाण, डाक संघटनेचे अध्यक्ष एस. व्ही. पवार, सचिव देविदास परदेशी, डाक सेवक संघटनेचे विशाल वेताळ, सागर गोरे आदींची उपस्थिती होती.

 

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker